मुनावळे जलपर्यटन केंद्रावर वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; पर्यटन विभागाकडून मिळवली सुधारित प्रशासकीय मान्यता
सातारा- शिवसागर जलाशयावर मुनावळे ता. जावली येथे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नातून जागतिक दर्जाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान हे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले पाहिजे त्यासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत मुनावळे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ९२ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
पर्यटनवाढ यासह स्थानिकांची व्यवसायवृद्धी आणि रोजगार निर्मिती या हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अभ्यासपूर्ण पाठपुराव्यातून मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र राज्य शासनाकडून मंजूर करून घेतले होते. या केंद्राचा उदघाटन सोहळा ९ मार्च २०२४ रोजी मुंख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला होता. दरम्यान, मुनावळे जलपर्यटन केंद्रावर पर्यटकांच्या सोयीसाठी आवश्यक सोयी सुविधा, बांधकाम व पायाभूत सुविधांची कामे करणे, अत्याधुनिक बोटी व जलपर्यटन केंद्र विकसित करणे यासाठी पूर्वी मंजूर असलेला ४५ कोटी ३८ लाख एवढा निधी पुरेशा पडणार नव्हता त्यामुळे या कामांसाठी वाढीव निधी मिळावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री आणि दोनी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत मुनावळे जलपर्यटन केंद्र विकसित करून येथे उच्चतम दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यासाठी ४७ लाख ७ लाख ९२ हजार एवढा वाढीव निधी मंजूर करून एकूण ९२ कोटी ४५ लाख ९२ हजार या रकमेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भरीव निधी उपलब्ध झाल्याने मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र विकसित होऊन अत्याधुनिक सोयी- सुविधा, पर्यटकांसाठी विविध प्रकारची आधुनिक बांधकामे, अत्याधुनिक बोटी, वॉटर स्पोर्ट्स सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे या भागातील पर्यटनवाढीला, रोजगार आणि व्यवसाय वृद्धीला खऱ्या अर्थाने मोठी चालना मिळणार आहे. याबद्दल समस्त जावलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे